top of page
Eye Test Glasses

Patient Education

अचानक दिसायचे बंद होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे दृष्टीचा पडदा निखळणे.

अंडाकृती अशा डोळ्याच्या पोकळीचे बाहेरचे आवरण म्हणजे पांढऱ्या रंगाचे स्क्लेरा .दृष्टीचा पडदा किंवा रेटिना स्क्लेराला आतुन अस्तरासारखा चिकटलेला असतो,त्याला आतुन डोळ्याच्या पोकळीत असलेल्या

जेलीसारख्या व्हिट्रियसचा आधार असतो तर बाहेरुन स्क्लेरा या डोळ्याच्या बाहेरील आवरणाचा. आपण कोणतीही वस्तु बघतो ती त्या वस्तुची रेटिनावर प्रतिमा पडल्यानेच. पण कधी कधी अपघाताने किंवा आपोआप रेटिना आपली जागा सोडुन डोळ्याच्या पोकळीत व्हिट्रियस मधे पडते. त्यामुळे दृष्टीची संवेदनाच नष्ट होते.व डोळ्याला दिसेनासे होते.बरेचदा रेटिना निखळण्याआधी त्यावर बारीक छिद्र किंवा चीर दिसुन येते.

आता रेटिना का निखळते ते पाहू.

टीव्हीवर क्रिकेटच्या मॅचेस चालु झाल्या कि गल्लोगल्ली क्रिकेटच्या खेळाला ऊत येतो.असेल तेवढ्या जागेत चौकार षट्कार मारले जातात.कधीकधी वेगात येणारा चेंडु एखाद्या खेळाडूच्या किंवा येणाऱ्या जाणाऱ्याच्या बरोबर डोळ्याला लागतो.अशा प्रकारे मार लागल्याने रेटिना निखळु शकते.अपघातात किंवा मारामारीतही हे घडु शकते.बहुधा त्या डोळ्याला त्वरित दिसेनासे होते. पण कधीकधी महिन्या दोन महिन्यानीही नजर जाऊ शकते.म्हणुन डोळ्याला मार लागल्यावर त्वरित नेत्रतज्ञाकडे जावे व रेटिना तपासुन घ्यावी.दृष्टी चांगली असली तरी हे करावेच कारण क्वचित प्रसंगी मार लागल्यावर रेटिनाचा पडदा पडलेला नसतो तर फक्त जागेवरच फाटलेला असतो. तपासणीत हे वेळीच कळले तर त्या जागी फक्त लेझर ट्रीटमेंट करुन नजर वाचु शकते.अन्यथा कालांतराने फाटलेली रेटिना एक दिवस निखळतेच व मग ऑपरेशन शिवाय पर्याय उरत नाही.

ज्या व्यक्तींना चष्म्याचा जास्त मायनस नंबर असतो त्यांची रेटिना फार नाजुक,विरविरित असते. ती थोड्याशा धक्क्याने किंवा काही न करताही निखळु शकते.म्हणुनच तीनपेक्षा जास्त मायनस नंबर असणाऱ्या सर्व पेशंटनी वर्षातुन एकदा तरी डोळ्यात ड्रॉप घालुन रेटिनाची तपासणी करुन घ्यावी. इथेही रेटिनाला गेलेली चीर किंवा पडलेले भोक वेळीच कळले तर केवळ लेझर करुन नजर वाचवता येते.एकदा का पडदा निखळला कि ऑपरेशनला पर्याय नाही.

डायबेटिसमधे रेटिनोपथी सुरु झाली व वर्षानुवर्ष त्याकडे लक्षच दिले नाही तर कालांतराने रेटिना निखळु शकते.ऑपरेननेही हे दुरुस्त होईल याची काही खात्री नाही.

वृद्धापकाळाने रेटिना कमजोर होऊन निखळु शकते.

मोतीबिंदुचे ऑपरेशन करताना काही गुंतागुंत झाल्यासही रेटिना निखळु शकते.

तसेच काही कारण नसतानाही रेटिना निखळु शकते.

बहुधा रेटिना निखळण्यापूर्वी बरेच वजन उचलल्याचे किंवा खुप धावपळ,प्रवास केल्याचे सांगितले जाते.म्हणुनच ज्यांचा रेटिना मुळातच कमजोर आहे त्यांनी जास्त वजन उचलणे,फार दगदग, शीर्षासन,गर्दीची ठिकाणे, मारामारी हे टाळावे.

तसेच डोळ्यापुढे काळे डाग फिरणे,ढग आल्यासारखे वाटणे किंवा डोळ्यासमोर लाईट/ विजा चमकल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसली तर त्वरित नेत्रतज्ञास दाखवणे. ही रेटिना निखळण्याची पूर्वलक्षणे आहेत.वेळीच उपचार केल्यास रेटिना निखळण्यापासुन वाचु शकते.

रेटिनल डिटॅचमेंट हा डोळ्याचा अत्यंत गंभीर आजार आहे.त्याचे ऑपरेशन अत्यंत किचकट असुन नंतर पूर्णपणे चांगले दिसण्याची शक्यता फार कमी.

त्यामुळे योग्य काळजी घेऊन हा प्रॉब्लम टाळणेच बरे.

डॉ आफळे आय हॉस्पिटलमधे अनेक पेशंटची वेळीच तपासणी केल्यामुळे लेझर उपचाराने रेटिना निखळण्यापासुन वाचवली आहे व अनेकांचे अंधत्व टाळले आहे.

Eye Test Glasses

For a clear tomorrow, Bring
your world into focus

bottom of page